महाविकास आघाडीतला एक संजय जाणार, भाजपाच्या अनिल बोंडे यांचा दावा

मुंबई – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार (Sanjay Raut and Sanjay Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी (Praful Patel from NCP and Imam Pratapgadhi from Congress) तर भारतीय जनता पार्टीने (BJP) पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक (Piyush Goyal, Anil Bonde and Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला (MVA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. या मतांमुळे आमचा विजय निश्चित झाला असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.

दुसऱ्या बाजूला राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. १०० टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही असं अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा (In Ashwattha) गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे असंही विधान यावेळी त्यांनी केलं.

महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार आहे. ५.३० वाजता कोणता ते कळेल असं सूचक विधान त्यांनी केलं. संध्याकाळी कोणत्या संजयला समजवण्यासाठी जातील ते पाहूयात असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे असंही त्यांनी सांगितलं.