मोहम्मद शमी दिसताच चाहत्यांकडून ‘जय श्री राम’चे नारे, सूर्यकुमारने दिली अशी प्रतिक्रिया- Video

अहमदाबाद- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर गावसकर सीरिजमधील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावा धावफलकावर लावल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनअंती १०० धावांचा आकडा पार केला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी काही चाहत्यांनी नकोशी कृती केली.

सोशल मीडियावर नरेंद्र मोदी स्टेडियममधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत भारतीय संघाच्या पव्हेलियनमागे बसलेले काही चाहते ‘जय श्री राम’चे नारे लगावताना दिसत आहेत. मात्र ते मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला पाहून मुद्दाम अशी नारेबाजी करत असल्याचे दिसत आहे. काहीजण अगदी शमीचे नाव घेत शमी जय श्री राम असे म्हणतो. यावर शमी कसलीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र हा सर्व प्रकार पाहून सूर्यकुमार यादव चाहत्यांकडे पाहून हात जोडतो.

एका ट्वीटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत निराशा व्यक्त केली आहे. अशा लोकांना स्टेडियममध्ये येण्यापासून बंदी घालायला पाहिजे, असे म्हणत त्या ट्वीटर वापरकर्त्याने त्रागा व्यक्त केला आहे.