या निवडणुकांमध्ये मोदीजींच्या विचारांचा विजय झाला, एकनाथ शिंदेंनी केला कौतुकाचा वर्षाव

Eknath Shinde On Election Results: पंतप्रधान नरेंद्र मोदीचा (PM Narendra Modi) करिष्मा, देशासाठी केलेले काम आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या (Amit Shah) नियोजनामुळे या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड विजय आणि यश मिळाले. आतापर्यंत लोक म्हणत होते ‘घर घर मोदी’ आता या निवडणुकांमध्ये ‘मन मन में मोदी’ अशा प्रकारचा हा एक निकाल या चार राज्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करत, सर्वांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

अनेक लोक म्हणत होते मोदींचा करिष्मा संपला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पराभूत होईल यासाठी खूप मोठे बदनामीचे षडयंत्र, आरोप, प्रत्यारोप मोदीजींवर केले. परंतु शेवटी हे निकाल जनतेच्या हातात असतात. जनतेने या निवडणुकीत मोदीजींना साथ दिली. मोदींबद्दल लोकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि आज मोदीजी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत ते या निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं.

काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा केली परंतु परदेशात जाऊन भारत तोडो अशा प्रकारची मोदींची आणि भारताची बदनामी ते करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला त्यांना त्यांची जागा दाखवली. शेवटी या राज्यांमध्ये देशावर प्रेम करणारे मतदार आहेत. राजस्थानच्या मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते. पण पाच वर्षात ते आश्वासन पाळले नाही असे मला तिथले मतदार सांगत होते. कर्नाटक मध्ये खूप मोठे मोठे आश्वासन देऊन जनतेला धोका देऊन ते निवडून आले. मात्र त्यांचेच उपमुख्यमंत्री आणि मंत्री सत्ता आल्यानंतर कर्नाटक सरकारकडे योजना पूर्ण करायला पैसे नाहीत, अशा प्रकारचा खुलासा करत आहेत असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या निवडणुकांमध्ये मोदीजींच्या विचारांचा विजय झाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशीही भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. घरी बसणाऱ्या लोकांना जनता मतदान करत नाही. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवतात. जे जनतेत जाऊन काम करतात त्यांनाच ही जनता मतदान करते. त्यामुळे हे सरकार जनतेचे सरकार आहे. लोकांजवळ पोहोचून त्यांना न्याय देण्याचे काम करते, असेही यावेळी शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा