गुजरात टायटन्सचा मॅच विनर साई सुदर्शनला घरातूनच लाभलाय खेळाचा वारसा, जाणून घ्या त्याच्याबद्दल

नवी दिल्ली- दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अरुण जेटली स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२३ चा सातवा सामना (DC vs GT) गुजरात टायटन्सने ६ विकेट्सने जिंकला. गुजरातच्या या विजयाचा खरा दावेदार ठरला साई सुदर्शन. गुजरातच्या महत्त्वपूर्ण विकेट्स गेल्यानंतरही साई सुदर्शनने धाडसी खेळी दाखवली आणि ४८ चेंडूत २ षटकार व ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावा करत संघाला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढले. त्याच्या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच कर्णधार हार्दिक पंड्यानेही त्याच्या प्रदर्शनाचे तोंडभरुन कौतुक केले.

या दमदार खेळीनंतर साई सुदर्शन चर्चेत आला आहे. तो नेमका कोण आहे?, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

साई सुदर्शन कोण आहे?
१५ ऑक्टोबर २००१ रोजी चेन्नई येथे जन्मलेला साई सुदर्शन (Who Is Sai Sudharsan) हा डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. वर्ष २०१९-२० मध्ये, तो एका स्पर्धेत ६३५ धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आणि प्रसिद्धीच्या झोतात आला. २०२१-२२ च्या देशांतर्गत टी२० स्पर्धेत त्याने तमिळनाडूसाठी पदार्पण केले आणि त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्येही पदार्पण केले. फेब्रुवारी २०२२मध्ये, गुजरात टायटन्सने आयपीएल लिलावात साई सुदर्शनला २० लाख रुपयांना विकत घेतले. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये विजय शंकर जखमी झाल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

घरातूनच मिळाला खेळाचा वारसा
ज्या कुटुंबातून सुदर्शन आला आहे, ते पाहता खेळ त्याच्या रक्तातच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे वडील एक खेळाडू होते ज्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (ढाका) भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तर आई राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू राहिली आहे.