मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा दाखला देत भूजबळांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले, स्वत:चा चुलत भाऊ आज….

नाशिक – मनसेप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) हे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर अतिशय आक्रमक भूमिका घेत असल्याने शिवसेनेची(Shivsena) चांगलीच कोंडी होत आहे. हिंदुत्वाच्या(Hinduism) आणि मशिदींवरील भोंग्याच्या(loudspeaker )मुद्यावर सुद्धा मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कथित सेक्युलर पक्षासोबत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेनेची गोची झाली आहे. यानंतर आता याबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.

‘मला वाटतं राज ठाकरेंनी तरी समजून घ्यायला पाहिजे. स्वत:चा चुलत भाऊ आज.. ज्यांच्यासोबत ते आयुष्यभर राहिले ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांना समजून घेतलं पाहिजे.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणाले, ‘अशा प्रकारचे भोंगे वैगरे लावल्याने एक प्रकारचं जातीयवादी वातावरण दंग्याचं निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. लोकांनी शांतता पाळावी.. हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील त्यांनी शांतता पाळावी. त्यांच्या या ट्रॅपमध्ये हिंदू किंवा मुस्लिम यांनी येऊ नये. दंग्याने कोणाचंही भलं होणार नाही.’

‘आपल्यापुढे प्रश्न आहेत बेरोजगारी, महागाई.. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. भोंगा हा काही प्रश्न नाही. यातून राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं राज ठाकरेंनी तरी समजून घ्यायला पाहिजे. स्वत:चा चुलत भाऊ आज.. ज्यांच्यासोबत ते आयुष्यभर राहिले ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेबांनी आपल्या स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त प्रेम हे राज ठाकरेंवर केलं आहे.’

‘आज उद्धव ठाकरे यांच्यावर ऑपरेशन्स होत आहेत, अडचणी आहेत.. तरी सुद्धा ते समर्थपणे राज्य सांभाळत आहेत. आणखी त्यांच्या रस्त्यामध्ये अशाप्रकारे विघ्न जे आहेत निर्माण करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही.’ असं म्हणत त्यांनी एक प्रकारे राज ठाकरे यांची समजूत काढण्याचाच प्रयत्न केला आहे.