सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट; म्हणाले…

सिंधुदुर्ग: संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे.   19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागा मिळाल्या आहेत.

जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे.भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत देखील पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली.

दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ‘गाडलाच’ या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. फेसबुक पोस्टमध्ये भाजप आमदार नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर ‘गाडलाच’ असं कॅप्शन लिहिलं आहे.