आधी तुम्ही राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा; शहाजीबापूंनी आदित्य ठाकरेंना ललकारले

सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूंनी आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा केला जात आहे. यातच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे रोज बंडखोर आमदारांचा राजीनामा मागत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘शिवसेनेचे चाळीस आमदार एकत्रित असल्याने आमचं बहुमत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, उलट बहुमत गमावलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित 15 -16 आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येवून दाखवावे,’ असा पलटवार सांगोल्याचे आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केला आहे.

आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही राजीनामे देणार नाही. तुम्हीच पंधरा सोळा जण उरलेले आहात. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत. तुमची आमदारकी शाबूत ठेवणार आणि आमच्या मागे लागणार का, असा सवालही आमदार पाटील यांनी उद्धव व आदित्य ठाकरे यांना उद्देशून केला. कायद्याची पुस्तकं वाचा जरा, असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला.