भाजप प्रेमापोटी राज ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे विस्मरण – राष्ट्रवादी

मुंबई – आजपर्यंतची राज ठाकरेंची (Raj Thackeray) सर्व भाषणे ऐकली तर ते स्वतः काय करणार…त्यांचा पक्ष काय करेल… महाराष्ट्रासाठी… देशासाठी त्यांचे काय व्हिजन आहे हे ते कधीच सांगत नाहीत…त्यामुळे ते उत्तम नकलाकार शोभतात असा जोरकस टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे.

रंगमंचावरील एक कथाकार ज्या पद्धतीने आपल्या कथेतील पात्रांचा वर्णन करतो, त्यांची नक्कल करतो, त्यांचा आवाज काढतो अशा पद्धतीने राज ठाकरे यांची भाषणे नकली असतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला. राज ठाकरेंच्या भाषणातून जनतेचे मनोरंजन होतं परंतु कार्यकर्त्यांना त्याच्यातून काही दिशा मिळत नाही तीच कार्यकर्त्यांची अडचण आहे आणि म्हणूनच राजकीय स्पेस मनसेचे कार्यकर्ते (MNS) निर्माण करू शकले नाही हे मन सैनिकांचं खरे दुःख आहे असेही महेश तपासे म्हणाले.

कालच्या राज ठाकरे यांच्या भाषणातील स्क्रिप्ट ही कोणी लिहिली असावी हा अंदाज लावणे काही कठीण नाही आणि म्हणूनच आगामी मनपा निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन करण्यासाठी भाजप एक नवीन ‘बी’ टीमची निर्मिती राज ठाकरे यांच्या रुपाने करत आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला समजू लागले आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी (MVA)सरकारने अनेक आव्हानांना तोंड देऊन त्याच्यावर मात केली आहे. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीची कामगिरी ही देशात अव्वल ठरली याचे राज ठाकरे यांना भाजप (BJP) प्रेमापोटी विस्मरण व्हावे याबाबत महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.