युपीएचं अध्यक्षपद घेणार का? शरद पवार म्हणाले, ‘मी नेतृत्व करण्याची…’

कोल्हापूर – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. ‘शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार’ असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

दरम्यान, आता या मुद्द्यावर स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे,असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत. ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे. इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस (congress) कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे.