दिवस फिरले : भाजपच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश;आगामी निवडणुकीत भाजपला दणका देणार

Laxman Savadi : कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बेंगळुरूमध्ये ही माहिती दिली. अथणी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लक्ष्मण सवदी यांनी 12 एप्रिल रोजी विधान परिषद सदस्यत्वाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी भाजपचे माजी नेते लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतकोणतीही अट ठेवली नाहीअसे म्हटले आहे. 9-10 पेक्षा जास्त विद्यमान आमदार आमच्यात सामील होऊ इच्छितात पण आमच्याकडे त्यांना बसवायला जागा नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, ‘भाजपने त्यांना अशी वागणूक देणे योग्य नव्हते. लक्ष्मण सावदी यांची काँग्रेसमध्ये येण्यासाठी एकच अट आहे की त्यांना योग्य वागणूक मिळावी. सिद्धरामय्या म्हणाले की, लक्ष्मण सावदी यांना अथणी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले जाईल याची 100 टक्के खात्री आहे. मला आशा आहे की ते तेथून नक्कीच जिंकतील.