“तुझे स्तन मोठे नाहीत, तुझ्या शरीरावर आमचा हक्क”, अभिनेत्री राधिका आपटेने सांगितली आपबिती

राधिका आपटे (Radika Apte) ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी तसेच काही तामिळ, मराठी, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसते. अभिनेत्रीने अनेक वेब सिरीज आणि लघुपटांमध्येही काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात थिएटरपासून केली आणि नंतर ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. सध्या तिचा ‘मिसेस अंडरकव्हर’ (Mrs Undercover) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकतेच एका ऑनलाइन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने तिच्या सुरुवातीच्या करिअरबद्दल सांगितले आणि तिची व्यथाही मांडली.

जेव्हा ती अभिनयात नवीन होती, तेव्हा ती बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा ती नवीन होती, तेव्हा तिला तिचे नाक ठीक करण्याचा आणि स्तनाचा आकार वाढवण्याचा सल्ला देण्यात आला होता. वाढलेल्या वजनामुळे तिला चित्रपटातही संधी देण्यात आल्या नव्हत्या.

अभिनेत्री राधिका आपटे म्हणाली, ‘तीन ते चार किलो वजनामुळे मी एक चित्रपट गमावला होता. अर्थात, जेव्हा तुम्ही सिनेसृष्टीत नवीन असता तेव्हा तुम्हाला म्हटले जाते, तू तुझे नाक का नीट करुन घेत नाहीस? तू तुझे स्तन का मोठे करत नाहीस? सुरुवातीला माझ्यासोबत हे घडले. मधेच काही लोक तुमच्या शरीरावर हक्क असल्याच्या भाषा करतात… आता जागरुकतेमुळे गेल्या काही वर्षात आपण याबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतो.’

राधिका पुढे म्हणाली, ‘सध्या परिस्थिती बददली आहे. जर सध्याच्या काळात कुणी अशा मागण्या केल्या तर अभिनेत्री म्हणू शकतात, जर तुम्ही मला पुन्हा असे काही करायला सांगितले तर मी या प्रोजेक्टमधून बाहेर पडेल.’ थोडक्यात राधिकाची कारकीर्द खूप यशस्वी आहे परंतु सुरुवातीचे दिवस तिच्यासाठी सुखद नव्हते. राधिकाच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या धारणा विचित्र आहेत, मी बदलापूर सिनेमा करेपर्यंत लोकांना वाटायचे की मी फक्त खेडेगावातील मुलगीच राहू शकते. बदलापूरनंतर लोकांना वाटू लागले की मी फक्त सेक्स कॉमेडी करू शकतो, मी न्यूड होऊ शकते. म्हणून, मी थांबले आणि मी त्याला कधीच हो म्हटलं नाही.