द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती, जाणून घ्या त्यांचा प्रवास

वैयक्तिक जीवन हे अतिशय संघर्षमय असताना देखील द्रौपदी मुर्मू या खचल्या नाहीत

सुचिता गायकवाड : द्रोपदी र्मुमू (Darupadi Murmu) या भारतातील दुसऱ्या महिला राष्ट्रपती (President Of  India) आणि आदिवासी समुदायातील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत.सुरुवातीच्या काळात द्रौपदी मुर्मू या एका कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका (assistant professor) होत्या, तसेच एक क्लर्क (Clerk) म्हणून देखील त्यांनी नोकरी केली होती. 1997 ला त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीस सुरुवात केली.  1997 ला त्यांनी मयूरभंज येथील रंगरायपुर या ठिकाणी प्रभाग नगरसेविका या पदासाठी त्यांनी निवडणूक लढवली व प्रभाग नगरसेविका या पदावर त्या निवडून देखील आल्या, त्यानंतर 2000 ते 2004 मध्ये ओडीसा सरकारच्या राज्यमंत्री झाल्या. 2007 मध्ये त्यांना नीलकंठ अवॉर्ड (Nilkanth Award)दिला गेला हा अवॉर्ड जनतेतील सर्वश्रेष्ठ नेत्याला दिला जातो त्यावेळेस त्या आमदार होत्या. 2015 साली झारखंड ची पहिली महिला आदिवासी राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली 2015 ते 2021 मध्ये त्यांनी राज्यकारभार संभाळला. राजकीय जीवनात द्रौपदी यांनी भरपूर यश मिळवले. एक क्लर्क ते राष्ट्रपती ही वाटचाल त्यांच्यासाठी सोपी नव्हती.

त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी ही वाटचाल खूप जिकिरची होती तसेच त्यांचे वैयक्तिक जीवन खूप खडतर परिस्थितीचे होते.
द्रौपदी या ओडिसा (Odisa)मधील मयूरभंज (Mayurbhanj) येथे वास्तव्यास आहेत त्यांचा जन्म 20 जून 1958 मध्ये झाला, ओडिसा मधील एका आदिवासी समाजातील मध्यमवर्गीय कुटुंबातून त्या आहेत, त्यांना आपल्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. 2009 मध्ये र्मुमू यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. याचा त्यांना धक्का बसला व त्या डिप्रेशनच्या शिकार झाल्या. त्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि ब्रह्मकुमारी या संस्थेचा त्या भाग झाल्या, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्या सावरतच होत्या की,  2013 मध्ये रोड अपघातात त्यांच्या दुसऱ्या मुलाचे निधन झाले. एवढेच नाही तर त्याच वर्षी त्यांनी आपल्या आई व भावाला देखील गमावले त्यानंतर वर्षभरातच त्यांचे पती निधन पावले. अशा पद्धतीने हळूहळू त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला गमावले.या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्यावर खूप गंभीर परिणाम झाला. त्यांनी अध्यात्मा सोबतच योग यासाठी आपला पूर्ण वेळ आधीन केला काही कालावधीनंतर म्हणजेच 2015 ला झारखंडच्या राज्यपाल पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

द्रौपदी र्मुमू या खूपच विनम्र स्वभावाच्या आहेत व त्यांना लोकनेत्या  तसेच जमिनीशी जोडलेल्या आहेत असे म्हटले जाते. एक क्लर्कनंतर शिक्षिका, नगरसेविका,राज्यमंत्री, महिला आदिवासी राज्यपाल आणि आज भारताचे राष्ट्रपती हा प्रवास खरंच द्रौपदी र्मुमू यांच्यासाठी सोपा नव्हता, वैयक्तिक जीवन हे अतिशय संघर्षमय असताना देखील द्रौपदी या खचल्या नाहीत आणि आज त्या भारताच्या सर्वात पहिला नागरिक म्हणून ओळखल्या जात आहेत म्हणजेच राष्ट्रपतीपद भारतातील तमाम जनतेसाठी हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.