“जर अर्जुन तेंडूलकर दुसऱ्या संघाकडून खेळला असता तर…”, पाकिस्तानी क्रिकेटरचं वक्तव्य चर्चेत

IPL 2023: सचिन तेंडुलकरचा मुलगा (Sachin Tendulkar Son) अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. प्रत्येकजण ज्युनियर तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाची वाट पाहत होता. अर्जुनने त्याच्या दोन्ही आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे वाहवाह लुटली. केकेआर विरुद्ध त्याने 2 षटकात 17 धावा दिल्या आणि हैदराबाद विरुद्ध त्याने 2.5 षटकात केवळ 18 धावा देऊन एक बळी घेतला. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफने (Rashid Latif) अर्जुनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “अर्जुन तेंडुलकरची ही सुरूवात आहे. त्याला आणखी जास्त मेहनत करावी लागणार आहे. कोणत्या मोठ्या खेळाडूने त्याला चांगले मार्गदर्शन केले तर तो त्याच्या गोलंदाजीत वेग आणू शकेल. हा अतिशय हळवा विषय आहे. प्रशिक्षण करून खेळाडूंमध्ये बदल करणे हे खुद्द सचिनने केले होते. पण त्याने यासाठी देशांतर्गत क्रिकेटवर विश्वास ठेवला. तुमचा पाया मजबूत असायला हवा. अर्जुनचे संतुलन चांगले नाही आहे आणि त्याची गती देखील कमी आहे. तो 135 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतो. तो एक चांगला फलंदाजही असून 2-3 वर्षात चांगला खेळाडू बनू शकतो.”

पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफने सांगितले की, अर्जुन दुसर्‍या फ्रँचायझीसाठी खेळला असता तर त्याची वृत्ती वेगळी असती. “जर तो सनरायझर्स हैदराबादसारख्या दुसर्‍या फ्रँचायझीसाठी खेळला असता तर त्याच्यात बदल दिसला असता. मात्र यावेळी त्याचे वडीलही ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यासोबत आहेत. त्याच्या वडिलांची भूमिका आता त्याच्या क्रिकेटशिवाय इतर आयुष्यातही असायला हवी”, असे लतीफने अधिक सांगितले.