चतुःशृंगी देवस्थानला दीड कोटी रुपयांचा निधी; आमदार माधुरी मिसाळ यांनी केला होता पाठपुरावा

Pune – शहरातली ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांवर मूलभूत विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यापैकी चतुःशृंगी देवस्थान परिसरात (Chathushringi Temple) विविध विकासकामे करण्यासाठी दीड कोटी रुपये मिळणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार हा निधी जाहीर करण्यात आला आहे.

चतुःशृंगी मंदिर परिसरात उद्यानाची निर्मिती आणि सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या निधीमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्‍वास वाटतो, असे मत देवस्थानचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचा विकास होण्यासाठी या निधीची मदत होणार आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानते. जी-२० परिषदेच्या माध्यमातून भारताचा समृद्ध वारसा, इतिहासाचे संवर्धन करून तो जगभर पोहोचविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जी-२० च्या निमित्ताने शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करून, हेरिटेज कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.