सफाई कामगारांना हक्काचे घर देऊन, त्यांच्यासोबत न्याय केला पाहिजे – लोढा

मुंबई – स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांना आता मुंबईतच हक्काचे घर मिळायला हवे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत केली.

या संदर्भात बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील हजारो सफाई कामगार मुंबईत दिवसरात्र स्वच्छतेचे काम करतात.आपण सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घर देत आहोत तर माझी महाविकास आघाडी सरकारला विनंती आहे की, मुंबईत सुमारे २० हजार पेक्षा जास्त सफाई कामगार आहेत. त्यांच्या मुलांना देखील आपला जीव धोक्यात टाकून मुंबईच्या स्वच्छतेसाठी सफाई करावी लागत आहे.

मुंबई महानगरपालिका तर्फे या कामगारांना कुटुंबासह राहण्यासाठी भाडेरहित सेवा निवासस्थानांचे वाटप करण्यात येते. या निवासस्थानांमध्ये सफाई कामगार वारसाहक्काने पिढ्यानपिढ्या राहत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. या संदर्भात जातीने लक्ष घालून ज्या ठिकाणी कामगार राहत आहेत, त्यांना तिकडेच हक्काचे घर देऊन त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा, असे मत मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत व्यक्त केलं.