गौतम अदानींना आणखी एक धक्का! जगातील टॉप-२० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतूनही झाले बाहेर

New Delhi| अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा हिंडेनबर्ग अहवाल (Hindenburg Report) प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपनीच्या (Adani Group) शेअर्सवर आलेल्या त्सुनामीने गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला हादरा बसला आहे. दिवसेंदिवस त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण होत आहे. ताज्या माहितीनुसार, गौतम अदानी आता जगातील टॉप- 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

अगदी फेसबुकच्या मार्क झुकरबर्गच्याही मागे
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net Worth) झालेल्या घसरणीमुळे ते अब्जाधीशांच्या यादीत 21व्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $61.3 अब्जांवर आली आहे आणि गेल्या 24 तासात त्यांनी $10.7 अब्ज गमावले आहेत. शेअर्सच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये गौतम अदानी आता फेसबुकच्या मार्क झुकरबर्गपेक्षा मागे पडले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती $69.8 अब्ज आहे आणि तो यादीत 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अदानी 24 तासांत 5 स्थानांनी घसरले
गौतम अदानी गुरुवारी (02 फेब्रुवारी) 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते आणि अवघ्या 24 तासांत ते पाच स्थानांनी घसरून 21 व्या क्रमांकावर आले आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत वाईट ठरत आहे. तोट्याबद्दल बोलायचे तर, ब्लूमबर्ग डेटानुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती $ 59.2 अब्जांनी कमी झाली आहे. केवळ गेल्या 10 दिवसांत त्यांचे 52 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

मुकेश अंबानीही टॉप-10 च्या यादीतून बाहेर
गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे ते आता टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेले दुसरे भारतीय अब्जाधीश आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीतही घसरण झाली आहे आणि ते टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत.

गेल्या 24 तासांत एका दिवसात 695 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्यामुळे मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $80.3 अब्ज इतकी खाली आली आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या अहवालात 12व्या स्थानावर पोहोचले आहेत. मात्र, संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांना मागे टाकून मुकेश अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.