जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम उभा आहे – पाटील

महाविकास आघाडीचे तिन्ही घटक अधिक आत्मविश्वासाने भविष्यकाळात एकत्रितपणे सर्व निवडणुकांना सामोरे जातील...

मुंबई  – जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. बरेच उमेदवार आघाडीवर आहेत निकाल लागायला रात्री उशिर होईल. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरच असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडी आज पुढे आहे हे फार मोठे असे यश आहे. सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे. मागच्या साडेतीन वर्षात महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने सत्तेत असो अथवा नसो उचलून धरले आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे जयंत पाटील यांनी आभार मानले.

इंडिया टूडेचा जो सर्व्हे आला होता तो खरा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या निवडणूक निकालावरून आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत मध्ये आमची महाविकास आघाडी पुढे आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीदेखील महाविकास आघाडीला कौल दिला आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात धोका देण्याचे जे काम झाले ते महाराष्ट्राने मान्य केलेले नाही. महापुरुषांचा अपमान करण्याचे काम महाराष्ट्रात सातत्याने सत्तारुढ पक्षाकडून व मंत्री आणि राज्यपालांकडून झाला ते महाराष्ट्राने सहन केलेले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणाने उभा आहे हे यावरून सिद्ध झाले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

नाशिकमध्ये भाजपला उमेदवार उभा करता आला नाही. उभा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसवतीने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. उमेदवारी भरताना थोडासा गोंधळ झाला. त्यानंतर सत्यजित तांबे हे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यात भाजपचा रोल राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या विचाराची लोकं महाराष्ट्रात दिसून आली आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

सत्यजित तांबे यांची उमेदवारी घोषित होताना किंवा सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर थोडासा गोंधळ मतदारांमध्ये झाला. कॉंग्रेसचा उमेदवार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्याचा परिणाम या मतदारसंघात असू शकतो. सुधीर तांबे यांचे मतदारसंघात चांगले संबंध होते हे नाकारता येणार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे अध्यक्ष ज्या भागात आहेत, उपमुख्यमंत्री ज्या भागात आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, वनमंत्री ज्या भागात राहतात त्या भागात उमेदवार मिळू शकला नाही तर महाराष्ट्राच्या दुसर्‍या भागात उमेदवार कसा मिळणार असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आता प्रचाराच्या गोष्टीवर बोलण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडीचा विजय होतोय याचे आम्हाला समाधान आहे. महाराष्ट्रातील जनता आमच्याबरोबर आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही घटक अधिक आत्मविश्वासाने भविष्य काळात एकत्रितपणे सर्व निवडणुकांना सामोरे जातील असा विश्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही त्यांच्या नागपूर आणि नागपूर विभागातील जनता त्यांच्याबरोबर नाही हे या मताधिक्याने सिध्द झाले आहे असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केला.