गौतम गंभीर लखनऊ सुपरजायंट्समधून देणार राजीनामा? ‘या’ फ्रँचायझीमध्ये होऊ शकतो सामील

आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे, पण असे असूनही सतत बदलांचा टप्पा सुरू आहे. आता लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) फ्रँचायझी सोडू शकतो, असे समजत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले जात आहे की गौतम गंभीर पुन्हा त्याच्या जुन्या संघ कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) भाग बनू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Supergaints) जेव्हा आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांनी गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक बनवले. अँडी फ्लॉवर यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पहिल्या दोन्ही हंगामात लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी चांगली राहिली आणि संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. आगामी हंगामापूर्वी अँडी फ्लॉवर संघातून बाहेर पडला असला आणि त्याच्या जागी जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. दरम्यान, भारताचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांची लखनऊ सुपरजायंट्सचे धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत बातमी येत आहे की, अँडी फ्लॉवरनंतर आता गौतम गंभीरही लखनऊ सुपर जायंट्स सोडू शकतो. दैनिक जागरणच्या बातमीनुसार, एका सूत्राने त्यांना सांगितले की, “मी एवढंच सांगेन की अँडीनंतर आता गौतम गंभीरही लखनऊ फ्रँचायझी सोडायला तयार आहे… मला त्यापेक्षा अधिक काहीही विचारू नका.”

त्याचबरोबर दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. वृत्तानुसार, गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सच्या संपर्कात आहे आणि लखनऊमधून राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जुन्या संघात परत येऊ शकतो. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे तो जुन्या संघात परत येऊ शकतो.