महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

Ramesh Chennithala: कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एसी. सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, एसी. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबीरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, नामदेव उसेंडी, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहमंत्र्यांचे आहे परंतु “गाडीखाली कुत्रा आली तरी विरोधक राजीनामा मागतील” असे विधान त्यांनी केले. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करण्यात आला, नागपुरात खून, मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या, जनता भयभीत आहे परंतु सरकार, मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाही. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला आहे. आता १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे शिबीर होत आहे. या शिबीरातही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे या शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन करतील. लोकसभा निवडणुका व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत यासाठी महाविकास आघाडी मजबूतपणे मैदानात उतरणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. दिल्लीत एक व मुंबईत दोन बैठका झाल्या आहेत लवकरच अंतिम निर्णय होईल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

CAA संदर्भात प्रश्न विचारला असता रमेश चेन्नीथला म्हणाले की, निवडणुक आली की भारतीय जनता पक्ष अशी जुमलेबाजी करत असतो. हे विधेयक मंजूर होऊन काही वर्ष झाले, या वर्षभरात त्यांना ते लागू करावे असे का वाटले नाही, आताच का ते CAA ची चर्चा करत आहेत. कारण त्यांना निवडणुकीत धार्मिक मुद्दा चर्चेत आणायचा आहे. CAA ला भाजापाशासित काही राज्यांचाही विरोध आहे, त्यामुळे CAA हा केवळ ‘चुनावी जुमला’ आहे, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी