गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांना दर्शवला पाठिंबा; धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर  मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शर्मा  यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. सोबतच नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभर निदर्शने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. शर्मा यांना देशभरातून विरोध होत असताना, माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गौतम गंभीरने ट्वीट करत म्हटलं की, माफी मागितल्यानंतरही एका महिलेबाबत देशभर द्वेषपूर्ण बोललं जात आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत तथाकथित ‘सेक्युलर लिबरल’ (Secular Liberal) लोकांचं मौन चिंताजनक आहे. असं गंभीर म्हणाला आहे.