विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या निशाण्यावर कॉंग्रेस नव्हे तर खडसे-पाडवी ?

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या तीनही उमेदवारांनी दैदिप्यमान विजय मिळवला आहे. हीच लय कायम ठेवत आता विधान परिषदेतही (Legislative Council) महाविकास आघाडीला जोरदार झटका देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांची निष्क्रियता, अपक्षांची नाराजी, संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाचाळपणा, महाविकास आघाडीत असणारी धुसफूस भाजपच्या पथ्यावर पडणारी असून याच जोरावर भाजप निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसच्या भाई जगताप (Bhai Jagtap) यांना या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमशा पाडवी (Eknath Khadse of NCP and Amsha Padvi of Shiv Sena) यांनाच भाजपकडून टार्गेट केले जाण्याची शक्यताच अधिक आहे. विधान परिषदेला एका जागेसाठी २७ मतांचा कोटा आहे. हे मतदानही गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ अपक्षच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमदारही कोणाला मतदान करतात? हे पाहणे शक्य नसल्यामुळे या पक्षांची मतेही फुटण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत (Prasad Lad and Sadabhau Khot) या दोघांनाही निवडून आणायचे असल्यास पहिल्या पसंतीची ४७ मते भाजपला आणावी लागतील. अर्थात पहिल्या पसंतीची इतकी मते आणली नाही, तरी पसंती पद्धतीच्या मतदानामध्ये योग्य गणिती रणनिती बनवल्यास दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची बेरीज करूनही हे दोघे निवडून येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपच्या चार उमेदवारांना निवडून येण्याची फारशी चिंता नाही. मात्र, पाचवा उमेदवार प्रसाद लाड व सहावा उमेदवार सदाभाऊ खोत या दोघांनीही आम्ही आरामात निवडून आणू, असे आता भाजपचे नेते बोलत आहेत.