आजारी बापाच्या मदतीसाठी धावली गौतमी; म्हणाली, ‘वडिलांनी माझ्यासाठी काहीही केलं नसलं तरीही…’

Gautami Patil’s Father: महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिचे वडील धुळ्यात बेवारस सापडले आहेत. स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांना ते खंगलेल्या अवस्थेत सापडले. ज्यानंतर दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. आपल्या वडिलांच्या या दुरावस्थेला पाहून गौतमीचेही मन पिघळले आणि तिने मोठा निर्णय घेतला आहे.

रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली. तसेच मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये. असे सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले. या ठिकाणी त्यांच्या मावशी आणि धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेल्या. यासंदर्भात स्वत: गौतमीने माहिती दिली आहे.

शिवाय वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करीन, अशी ग्वाहीदेखील दिली आहे.