‘परफॉर्मन्स’ आणि ‘टॅलेंट’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी- चंदु बोर्डे

पद्मभूषण चंद्रकांत (चंदु) बोर्डे यांना कै कॅ शिवरामपंत दामले पुरस्कार प्रदान

Chandu Borde : क्रीडा क्षेत्रात आपल्या पाल्याने यावे यासाठी पालक प्रोत्साहन देत आहेत ही गेल्या काही वर्षातील सकारात्मक बाब आहे. मात्र, पालकांनी आपल्या पाल्याचा खेळातील परफॉर्मन्स अर्थात कामगिरी आणि त्याच्यामध्ये असलेले टॅलेंट अर्थात प्रतिभा यामध्ये गल्लत करू नये. तुमच्या पाल्याची व्यक्तिगत कामगिरी चांगली असली तरी तो उत्तम खेळाडू आणि संघासोबत खेळणारा चांगला खेळाडू होऊ शकेल का हे ठरवण्याची जबाबदारी तुम्ही निवड समितीवर सोपवा असे प्रतिपादन पद्मभूषण चंद्रकांत (चंदु) बोर्डे (Chandrakant (Chandu) Borde)  यांनी केले.

एखादा खेळाडू कसा खेळतो, कोणा विरुद्ध खेळतो आणि कोणत्या परिस्थितीत कामगिरी करू शकतो हे आम्ही पारखतो. संघासाठी तो खेळाडू किती योग्य आहे यावर त्याचे संघातील स्थान ठरते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रीय मंडळातर्फे क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा यावर्षीचा कै कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार सुप्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांना आज प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रीय मंडळाचे मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक – अध्यक्ष व भारताचे इथॅनॉल मॅन अशी ओळख असेलेले डॉ. प्रमोद चौधरी (Dr. Pramod Chaudhari )यांच्या हस्ते बोर्डे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सरकार्यवाह रोहन दामले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे हे २६ वे वर्ष असून रुपये २५ हजार रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

याबरोबरच यावेळी यशवंत सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्कार सकाळचे वरिष्ठ वार्ताहर योगिराज प्रभुणे (Yogiraj Prabhune)  यांना तर कै कॅप्टन सुशांत गोडबोले स्मृती पुरस्कार हा मल्लखांब पटू शुभंकर खवले यांना प्रदान करण्यात आला. याबरोबरच जिनेश नानल, श्रेयसी जोशी, विश्वेश पाटील, शिप्रा पैठणकर (Jinesh Nanal, Shreyasi Joshi, Vishvesh Patil, Shipra Paithankar) या महाराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांचा आशियायी स्पर्धेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

चंदु बोर्डे पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात दामले कुटुंबीयांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. सध्या ज्या वेगाने आपली जीवनशैली बदलत आहे, त्याप्रमाणे खेळ बदलत आहे, खेळात प्रगती होत आहे. अशाच खेळांना महाराष्ट्रीय मंडळ हे गेली १०० वर्षांपासून प्रोत्साहन देत आहे ही समाजासाठी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.

आज चांगले खेळाडू तयार होणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक जगात खेळाडूंनाही अत्याधुनिक सोयी सुविधा मिळायला हव्यात. मंडळ केवळ या सुविधा देऊन थांबत नाहीये तर ते विद्यार्थ्यांना खेळासाठी आवश्यक शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देखील करत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. यामुळे चांगले खेळाडू तर तयार होतीलच शिवाय चांगले नागरिकही घडतील असा मला विश्वास आहे, असेही चंदु बोर्डे यांनी नमूद केले.

महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेबद्दल पुणे शहरात आदर आणि कौतुकाची भावना आहे. चंदु बोर्डे यांनी सांगितल्याप्रमाणे खेळाडूच्या कामगिरीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर लक्ष देऊन त्यांना प्रशिक्षित करणे आज गरजेचे आहे. ही गोष्ट खेळाडू, पालक आणि क्रीडा शिक्षक सर्वांनीच समजून घ्यायला हवी, असे डॉ प्रमोद चौधरी म्हणाले.

रोहन दामले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एअर मार्शल भूषण गोखले यांनी आभार मानले. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ बहाद्दर भारतीय क्रिकेटपटूंना दुखापतीही रोखू शकल्या नाहीत, एकाने तर कर्करोगाशी झुंज दिली अन् मैदान गाजवलं

सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल