अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचे छापे

मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी दोन नेत्याच्या घरी छापेमारी झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल आणि शिवसेना नेते संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारलाआहे.

परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.

दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या रडारवर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.