‘मी वसंतराव’चे समीक्षकांसह प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक !

पुणे – निपुण धर्माधिकारी(Nipun Dharmadhikari) दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ (Mi Vasantrao)हा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून सिनेसृष्टीतील कलाकार, समीक्षक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. याशिवाय प्रेक्षकांकडूनही ‘मी वसंतराव’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत(Jio Studios Presents) या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी चित्रपटाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे. निपुणने चित्रपटाची उत्कृष्ट मांडणी केली असून राहुलने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा चित्रपट आहे, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी दिली आहे. तर संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ”हा चित्रपट माझ्या जवळच्या लोकांनी बनवला आहे. मला अभिमान वाटतो की, मराठी सिनेसृष्टीत असा संगीतमय चित्रपट बनला.” आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून दिसते. मात्र हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केले आहे. जिओ स्टुडिओजने ‘मी वसंतराव’च्या निमिताने नवी सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाहताना कुठेही यात राहुल आहे, असे वाटत नाही. वसंतरावच आहेत असा भास होतो. अशा शब्दांत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाची स्तुती केली आहे. या चित्रपटाला अश्विनी भावे, रेणुका शहाणे, अंकुश चौधरी, गितांजली कुलकर्णी, आदित्य सरपोतदार, स्वप्नील बांदोडकर, रवी जाधव, वैदेही परशुरामी आदी कलाकारांनीही चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तर समीक्षकांनीही ‘मी वसंतराव’ला पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाचे दमदार संगीत आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अफलातून आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावा असा चित्रपट, काळजाला भिडणारे संगीत, खूपच सुंदर सांगितिक चित्रपट असून केवळ आठवडे नाही तर दशकापर्यंत हा चित्रपट चालावा, असा हा सिनेमा आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. याव्यतिरिक्त प्लाझा सारखे सर्वसामान्यांसाठी असलेले चित्रपटगृह असो वा पॅलेडिअमसारखे उच्चभ्रू वर्गासाठी ओळखले जाणारे थिएटर असो, अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी चित्रपट संपल्यावर शेवटच्या नावापर्यंत थांबून टाळ्यांच्या कडकडाटात पसंती दर्शवली तर पुण्याच्या काही थिएटरमध्ये प्रेक्षक भावनिक होऊन, राहुल देशपांडे यांच्या पाया पडत होते. तर काही प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रूही येत होते.

‘मी वसंतराव’ला मिळालेल्या या प्रेमाबद्दल, यशाबद्दल दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ” प्रेक्षक, समीक्षक, सिनेसृष्टीतील मंडळी, मित्रपरिवार या सगळ्यांकडून आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे खूपच आनंद झाला आहे. इतक्या वर्षांच्या मेहनतीची चीज झाल्याची भावना सध्या मनात आहे. सर्वांचेच मनापासून आभार.”

तर पं. पंडितरावांची भूमिका साकारणारे त्यांचे नातू राहुल देशपांडे म्हणतात, ”मी आजोबांच्या सहवासात फारसा आलो नाही, मात्र ‘मी वसंतराव’च्या निमित्ताने मला त्यांचे आयुष्य जगता आले. याहून सुदैवाची गोष्ट दुसरी कोणती असूच शकत नाही. आज या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्याने आयुष्य जवळून अनुभवता आले. त्यांचा पं. वसंतराव देशपांडेंपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता. आज सगळ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून, ऐकून भारावलो आहे.