स्वत:ला पैगंबर म्हणवून घेणे इरफानला पडले महागात; न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

Pakistan Blasphemy:पाकिस्तानच्या गुलबागी येथील रहिवासी असलेल्या इरफानला ईशनिंदा कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इरफानवर असा आरोप होता की, त्याने ६ वर्षांपूर्वी मशिदीमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरद्वारे स्वतःला पैगंबर मोहम्मद म्हणवून घेतले होते. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

इरफानला फाशीची शिक्षा देण्यासोबतच पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 4 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ६ वर्षांपूर्वी इरफानने स्वत:ला पैगंबर मोहम्मद म्हटले होते, तेव्हा मशिदीत उपस्थित तबलीगी जमातच्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.ABP न्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान,  इरफानचा खटला प्रथम मर्दान शहरातील न्यायालयात चालला होता, त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयात लागू असलेल्या नियमांनुसार या खटल्याची सुनावणी झाली. जिथे इरफानला फाशीच्या शिक्षेव्यतिरिक्त वेगवेगळ्या कलमांमध्ये 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापूर्वी 30 मे रोजी पाकिस्तानातील बहावलपूर येथील न्यायालयात नुमान नावाच्या 22 वर्षीय ख्रिश्चनाला देशातील ईशनिंदा कायद्यांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये जमावाने मिळून एका व्यक्तीची हत्या केली होती. मृत्यू झालेल्या व्यक्तीवर ईशनिंदा केल्याचा आरोप होता. 40 वर्षीय विद्वानांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुलना  पैगंबरांशी केल्याचा आरोप लोकांनी केला होता.