हरभऱ्याचा हमी भाव ५ हजार २३० रुपये; खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

अमरावती : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभऱ्याचा हमी भाव ५ हजार २३० रुपये असल्याचे जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे यांनी आज सांगितले.नाफेडच्या वतीने हंगाम 2021-22 मध्ये हरभरा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यात एकूण आठ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

नाफेडतर्फे जिल्ह्यात आठ ठिकाणी नोंदणी सुरू

जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, धारणी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत, तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पथ्रोट व नेरपिंगळाई येथे विविध कार्यकारी सह. संस्था, नेरपिंगळाईमार्फत नोंदणी सुरू आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

हरभरा विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती जिल्हा पणन अधिकारी श्रीमती धोपे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आधारभूत किंमत खरेदी योजनेत यंदाच्या हंगामात हरभरा विक्रीसाठी शेतकरी बांधवांनी ई-पीक ॲपद्वारे पीकपे-याची नोंद केलेला सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आधारकार्डाची झेरॉक्स प्रत, आधार लिंक बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. पासबुकावर शेतक-याचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे धोपे यांनी सांगितले.

हरभ-याचा हमीभाव ५ हजार २३० रूपये आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.