गुणरत्न सदावर्तेंना दणका; दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द झाली

Mumbai –  बार काउन्सिल ऑफ इंडियानेअॅड. गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte)  मोठा धक्का दिला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्ररकणी अॅड. सुशील मंचरकर (Adv. Sushil Mancharkar) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बार काउन्सिलने वकिलांसाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत. ज्यामध्ये वकिलांनी कसे वागावे आणि काय काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.  यातील निमय 7 मध्ये वकिलांनी सार्वजनिक ठिकाणी कोट आणि बँड घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या दोन्ही गोष्टी न्यायालयीन परिसरात किंवा न्यायालयीन कार्यक्रमातच वापरण्यास परवानगी आहे.  मात्र, सदावर्तेंनी आझाद मैदानासह अनेक बैठकांमध्ये हजेरी लावली होती.

एवढेच नव्हे तर, सदावर्तेंनी कोट आणि बँड घालून नाच केला होता. सदावर्तेंचे हे वर्तन एकप्रकारे वकिली नियमांचे उल्लंघन आणि अपमान करणारे होते. याच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल केली गेली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यात बार काउन्सीलने वकिलांसाठी ठरवून दिलेल्या नियामाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकीली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना पुढील दोन वर्षे वकिली करता येणार नाही.