नाशिक पदवीधर निकालाआधी शुभांगी पाटील त्र्यंबकेश्वरात, ‘त्र्यंबक राजा’ला विजयासाठी साकडे

नाशिक: राज्यभरातील ५ विधानपरिषदांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक करणारे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) की भाजपाला रामराम ठोकत महाविकास आघाडीचा हात धरणाऱ्या शुभांगी पाटील या निवडणुकीत बाजी मारतील?, याची उत्कंठा चाहत्यांमध्ये आहे.

या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी शुभांगी पाटील यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे शुभांगी पाटील यांनी त्र्यंबक राजाचे मनोभावे दर्शन घेऊन आपलाच विजय होण्याची प्रार्थना केली. तसेच त्यांच्या मातोश्री आणि काकू यांनी देखील त्र्यंबक राजाला विजयासाठी साकडे घातले आहे.

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे.  २ लाख ६२ हजार ६७८ पैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी हक्क बजावला आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.  मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं असून अडीचशेहुन अधिक पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.