तापसी पन्नू अडचणीत, अभिनेत्रीवर हिंदू देवी-देवतांना अपमान केल्याचा आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

इंदूर- अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. इंदूरमध्ये हिंद रक्षक संघटनेने चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. एकलव्य गौर नामक व्यक्तीने सोमवारी छत्रीपुरा पोलिस ठाण्यात तापसीविरोधात तक्रार दाखल केली आहे. हिंद रक्षक या संघटनेने याप्रकरणी अभिनेत्री तापसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास निदर्शने करण्यात येतील, असे तक्रारीत लिहिले आहे.

हा वाद तापसीने एका फॅशन शोमध्ये केलेल्या लूकमुळे निर्माण झाला आहे. हिंद रक्षक संघटनेच्या एकलव्य गौरने फोटोचे स्क्रीन शॉट्स पोलिस अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून दिले आहेत, ज्यात तापसीने बोल्ड ड्रेसवर लक्ष्मी देवीचा फोटो असलेला हार घातला आहे. तापसीच्या या कृतीमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अभिनेत्री तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. या फॅशन शोमध्ये तापसीने खुल्या गळ्यातील ड्रेसवर देवी लक्ष्मीचा फोटो असलेले लॉकेट गळ्यात घातले आहे. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.