छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राज्यपालांनी नीट वाचला असता तर आनंद झाला असता – तपासे

मुंबई   – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या हा इतिहास राज्यपालांनी नीट वाचला असता तर आनंद झाला असता असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा समर्थ रामदासांसोबत दुरान्वये संबंध नव्हता मात्र राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज समर्थ कसे झाले व कुणामुळे झाले हा सांगण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. त्यांनी छत्रपतींना घडवले. सर्व ज्ञानाचे धडे दिले असे असताना समर्थ रामदास यांचा संबंध जोडणे आवश्यक नव्हते असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

रशिया आणि युक्रेन या देशातील युध्द लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही महेश तपासे यांनी दिली. हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन व पोलंडच्या सीमाभागात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावेत अशी विनंती पवारसाहेबांनी केली आहे.

नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारची मुलुखमैदान तोफ…

नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारची मुलुखमैदान तोफ असल्याने त्यांना बदनाम व आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. ज्या केसमध्ये गोवलंय ते प्रकरण फार जुनं आहे. ज्या कायद्याअंतर्गत चौकशी सुरू आहे त्या काळात कायदा अस्तित्वात नव्हता. ज्या लोकांचा संबंध जोडला जातोय ती लोकं हयात नाहीत त्यामुळे नवीन जागा घेतली असा प्रकार नाही असेही महेश तपासे म्हणाले. टेरर फडींग असा जो शब्दप्रयोग देवेंद्र फडणवीस यांनी जोडला आहे तशी वस्तुस्थिती नाही. नवाब मलिक यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.