रोहित शर्माची कॅप्ट्न्सी धोक्यात, वनडे विश्वचषकानंतर जाणार नेतृत्त्वपद? ‘हा’ मातब्बर खेळाडू दावेदार

भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने १२ धावांच्या फरकाने जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता उभय संघातील दुसरा वनडे सामना २१ जानेवारीला खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या कर्णधारपदाशी (Rohit Sharma Captaincy) संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

इनसाइड स्पोर्ट्सच्या एका अहवालात असे म्हटले गेले आहे की, रोहित आगामी आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ पर्यंतच (ODI World Cup 2023) भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सांभाळेल. या क्रिकेट स्पर्धेसह रोहितचा भारताच्या वनडे आणि टी२० कर्णधारपदाचा कार्यकाळही समाप्त होईल. यानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) २०२४ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाची कमान सांभाळेल.

बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तात, रोहित शर्मा या वर्षाच्या अखेरीस वनडे संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे म्हटले आहे. पुढे रोहित केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळेल, अशी बीसीसीआयला आशा आहे. मात्र, त्याच्या कसोटी कर्णधारपदाचा आणि भविष्याचा निर्णय वनडे विश्वचषकानंतर घेतला जाईल. दरम्यान, कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याच्या शर्यतीत केएल राहुलही आघाडीवर आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या अहवालात म्हटले आहे की, ‘सध्या रोहित यंदाच्या वनडे विश्वचषकात भारताचे नेतृत्व करेल. पुढचा कर्णधार कोण होणार?  पुढे काय करायचे? याचे नियोजन केले पाहिजे. मी फक्त गोष्टी घडण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. योग्य नियोजन केल्यानंतरच मी यावर काही प्रतिक्रिया देऊ शकेन. २०२३च्या विश्वचषकानंतर रोहितने वनडे फॉर्मेट किंवा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यास, आम्हाला योजना बनवण्याची गरज आहे.’

‘हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तो तरुण आहे आणि भविष्यात तो आणखी अनुभवी होईल. सध्या रोहितनंतर तोच सर्वात चांगला पर्याय आहे. त्याला पाठिंबा दिला पाहिजे’, असेही बीसीसीआय अधिकाऱ्याने शेवटी म्हटले.