Breaking : शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी

Mumbai – ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता. या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात शिंदे गटाकडून दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे.

शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला. उच्च न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेसाठी उत्साह दुणावणारा आहे.

पालिकेने शिंदे गट (Eknath Shinde camp) आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.