राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी; मेळाव्यांचा लावला धडाका 

NCP  – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मेळावा दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुलामध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar), राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला राज्यातील युवकांचा फार मोठा प्रतिसाद मिळेल. याअगोदर महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अभूतपूर्व असा मेळावा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झाला. त्यामुळे युवकांचा मेळावादेखील अभूतपूर्व होईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेलच्यावतीने नवी मुंबई येथे अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यालाही राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तालुका, जिल्हयात आठवडाभर भरगच्च कार्यक्रम घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यावरुन ‘शिवजयंती आमचे प्रेरणास्रोत’ अशाप्रकारची यात्रा निघून रायगडावर त्याचा समारोप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक, युवती, विद्यार्थी यांच्यावतीने हा सप्ताह साजरा केला जाणार असून वेगवेगळे शिवभक्तीपर कार्यक्रम संबंध राज्यभर होणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दिनांक २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मागासवर्गीय सेलच्यावतीने आणि त्याचदिवशी बीड येथे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी संघटनेच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी कोल्हापूर दौरा झाला. त्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्राशी कनेक्ट होत अजित पवार काम करत आहेत त्यामुळे उत्तम संवाद वेगवेगळ्या घटकांशी आणि क्षेत्राशी होत असल्याने त्याला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्यावतीने संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात कार्यक्रम होत असतानाच महायुतीचे मेळावे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन करत आहोत. दोन – तीन दिवसात समन्वय समितीची बैठक होईल आणि सहा मेळावे सहा प्रादेशिक विभागात नक्की केलेले आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल