हिंदू कधीही कट्टर होऊ शकत नाही, कारण…

नागपूर – अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे वाद देखील निर्माण होताना दिसून आले आहेत. यातच त्यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून या वक्तव्याची देखील चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.

‘माणुसकीने वागणे हा माणसाचा धर्म आहे आणि तोच हिंदू धर्म आहे. हिंदू असणे म्हणजेच माणूस असणे आहे. जो धर्म नियमांनी बांधलेला असतो, तेथे कट्टरता निर्माण होते. हिंदू कधीही कट्टर होऊ शकत नाही, कारण येथे कोणतेही कडक निर्बंध नाहीत. शंभर टक्के नास्तिक माणूसही हिंदू म्हणविला जातो, आहे हे या धर्माचे अद्भुत सौंदर्य आहे’, असे शरद पोंक्षे यांनी मांडले.

भूतकाळ माहिती नसेल तर वर्तमान आणि भविष्य ठरवता येत नाही. आम्हाला आमच्या देशाचा इतिहास विसरायला आमच्या राज्यकर्त्यांनीच भाग पाडले, म्हणून भूगोल बिघडत गेला. मूळ भारतातील ५० टक्के भूभाग आम्ही याआधीच गमावला आहे. मागील १३०० वर्षांत सतत आक्रमणे झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले, मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या. पण, हिंदू धर्म संपला नाही.

हा देश इस्लामिक राष्ट्र झाले नाही. या हिंदू धर्मात काय जादू आहे हे एकदा समजून घेतले पाहिजे. या धर्माचे इस्लामीकरण कधीही होऊ शकणार नाही. कुणी मूर्ती तोडल्या म्हणून ते आमच्यातील राम, कृष्ण आणि महादेव संपवू शकले नाहीत’, असे पोंक्षे म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.