सोनिया गांधींचे पुन्हा एकदा काँग्रेस’चे स्वप्न प्रत्यक्षात आणू : बाळासाहेब थोरात

मुंबई – महसूलमंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करताना म्हणाले की, समतेचा संदेश देणाऱ्या साईबाबाच्या पावन नगरीत काँग्रेसची नवसंकल्प कार्यशाळा होत असून सर्व संतांनी समता, बंधूभावाचा संदेश दिला, माणसा-माणसात भेदभाव करू नये ही संतांची शिकवण आहे. काँग्रेसचा विचारही याच समतेच्या विचारावर आधारलेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनीही तोच विचार दिला असून तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यशाळेला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील  एच. के. पाटील   प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा हा  विचारच देशाला तारणारा आहे, पुढे घेऊन जाणारा आहे.काँग्रेसशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही म्हणूनच काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी ‘पुन्हा एकदा काँग्रेस’चा जो नारा दिला आहे तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन झाले व त्यानंतर प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. दुपारी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसऱ्या दिवशी सादरीकरण होईल.