हाजी मस्तान आणि करीम लाला हे दोन डॉन एकत्र कसे आले ?

Mumbai – मुंबईच्या अंडरवर्ल्डचा जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा करीम लाला आणि हाजी मस्तान,वरदराजन या डॉन्स उल्लेख नेहमी येतो.या तिघांनी मिळून बराच काल मुंबईवर अधिराज्य गाजवलं. मुंबईत नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांच साम्राज्य गुन्हेगारी विश्वात सुरु होण्यापूर्वी करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन या तिघांचं साम्राज्य होतं, असं म्हटलं जातं. मात्र हे दोन डॉन ज्या समझोत्यामुळे एकत्र आले त्याबाबत आणि व्यावसायिक भागीदार कसे बनले याबाबत आज आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण करीम लाला आणि हाजी मस्तान या दोघांबाबत अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत.

मूळचा अफगाणिस्तानचा असलेला करीम लाला स्वातंत्र्यपूर्व काळात पेशावरहून येऊन मुंबईत स्थायिक झाला. क्लब्सच्या नावाखाली जुगाराचे अड्डे सुरु करून त्यानं आपला व्यवसाय हळूहळू वाढवत नेल्याचं म्हटलं जातं. करीम लाला हा व्याजाने पैसे देणारा सावकार होता. दुसऱ्या बाजूला हाजी मस्तान हा देखील एका माफिया टोळीचा म्होरक्या होता. मूळचा तामिळनाडूचा असणारा हाजी मस्तान याचा त्याकाळी बराच दबदबा होता. मुख्यत: हाजी मस्तानचे त्याकाळी सोन्या-चांदीची स्मगलिंग,इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्मगलिंग आणि इतरही काही छोटे मोठे काळे धंदे होते.

हाजी मस्तानच्या स्मगलिंगचा धंदा तसा बराच वाढला होता मात्र छोट्या मोठ्या टोळ्या आणि पोलीस यांच्या वाढत्या कारवायांमुळे त्याला शक्तिशाली अशा पार्टनरची आवश्यकता होती. अशा वेळी त्याची नजर करीम लालावर पडली. करीम लाला हे नाव त्याकाळी गुन्हेगारी विश्वात सर्वांनाच ठावूक होते. मस्तान नेहमीच अशा व्यक्तीच्या शोधात होता जो त्याच्यासाठी गुंतागुंतीचे प्रश्न कोणत्याही रक्तपात न करता हाताळू शकेल.

पुढे करीम लालाकडे हाजी मस्तानने भेटीसाठी वेळ मागितली. करीम लालाने देखील मस्तानबद्दल खूप ऐकलं होतं पण त्याला यापूर्वी कधीही भेटले नव्हते.करीम लालाने मस्तानसाठी अतिशय स्वादिष्ट मेजवानी बनवली.जेवण झाल्यानंतर दोघे गप्पा मारू लागले. मस्तान करीम लालाला उद्देशून म्हणाला,’खान साब, मित्राप्रमाणे एकत्र बोलण्यात खूप मजा आली, पण आता माझ्याकडे तुमच्यासाठी व्यवसायाची ऑफर आहे.’ करीम लाला या ऑफरचीच वाट पाहत होता.

मस्तान पुढे म्हणाला, ‘मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या तटबंदीवर माझा बराच माल येतो. माल उतरवून पुढे गोदामात नेला जातो आणि नंतर ट्रकमध्ये भरून बाहेर पाठवला जातो. माझा माल विकला जाईपर्यंत या मालाचे रक्षण करण्यासाठी तुमच्या माणसांची गरज लागेल.’ मस्तानला हे चांगलेच माहित होतं की जोखीम नसल्यामुळे लाला हे काम नक्की करेल.

यावर करिम लाला म्हणाला, या कामात काही रक्तपातही करावा लागेल का? मस्तान हसला आणि म्हणाला, तुमची माणसं आजूबाजूला असतील तर कुणीही आमच्या कामात ढवळाढवळ करायची हिम्मत करेल का ? स्मित हास्य करत करीम लालाने आणखी एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे खूप सोपे काम आहे पण यातून मला काय मिळणार ?’ यावर मस्तान म्हणाला, ‘बघा खान साब, मी तुम्हाला निश्चित हिस्सा देण्याचे वचन देऊ शकत नाही, परंतु आपला हिस्सा हा त्या मालाच्या किंमतीवर अवलंबून असेल. मग, मालाच्या आधारे आपण आपला हिस्सा ठरवला तर कसं राहील?’

या प्रश्ना नंतर थोडा वेळ शांतता पसरली. शेवटी करीम लालाने एक दीर्घ श्वास घेतला, हाजी मस्तानकडे एक कटाक्ष टाकत हसत हसत हात पुढे केला.दोघांनी हस्तांदोलन केले. आणि अशारीतीने मुंबईतील अंडरवर्ल्डच्या त्या काळातील सर्वात घातक करारावर शिक्कामोर्तब झाले.हीच नवी युती पोलिसांसाठी पुढे मोठी डोकेदुखी ठरली होती. तर अशा पद्धतीने मुंबईतील दोन डॉन एकत्र आले होते.