उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल – शरद पवार

छगन भुजबळांच्या येवल्यातून शरद पवारांनी प्रचंड गर्दीत राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडला...

नाशिक   – काही लोक सांगतात माझे वय झाले. वय झाले ही गोष्ट जरी खरी असली तरी गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे? उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत दिला.

आमची तक्रार इतकीच आहे ज्या जनतेने निवडून दिले, ज्या जनतेला वचन दिले त्या जनतेच्या विश्वासाला तडा बसणारे पाऊल तुम्ही टाकले असेल तर ती गोष्ट आम्ही सहन करणार नाही. ती गोष्ट कोणी करत असेल तर त्यांना त्यांची किंमत आज ना उद्या द्यावी लागेल. तो इतिहास इथे घडेल, अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.

जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की, नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. त्यामध्ये जनार्दन पाटील, मारोतीराव पवार, अंबादास बनकर, कल्याणराव पाटील, आणि अलीकडच्या काळातील दराडे बंधू यांची आठवण होते. या सगळ्यांबरोबर एका कालखंडात काम करण्याची संधी मिळाली. अलीकडे जबाबदारी वाढली, देशपातळीवर काम करण्याची स्थिती आल्याने इथे येणे कमी झाले असेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांनी गेली अनेक वर्षे पुरोगामी विचाराला साथ दिली त्यामध्ये नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर येतो. या जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, आदीवासी या सर्वांवर संकटे आली तरी त्यांनी साथ सोडली नाही. त्यामुळे विचार केला की मुंबईमध्ये काही लोकांना जनतेसमोर सादर केल्यावर यश मिळवता आले नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही येवल्याची निवड केली. इथे निवडणुकीसाठी दिलेली नावे कधी चुकली नाहीत. पण एका नावाने घोटाळा झाला. त्याठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला. त्यासाठी आज मी माफी मागण्यासाठी आलोय. माझा अंदाज फारसा चुकत नाही पण इथे माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले. त्यामुळे तुम्हाला यातना झाल्या. आगामी काळात लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा मी पुन्हा येऊन चुक न करता योग्य निकाल सांगेल त्याला या तालुक्यातील मतदाराची साथ मिळेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

येवला मतदारसंघात पाण्याचा, उद्योग-धंद्याचा, कांद्याच्या किंमतीचा प्रश्न आहे. राजकारण हे सामान्य माणसाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करायचे असते असे सांगतानाच या मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघटनेत परकीयांविरोधात लढण्यासाठी तात्या टोपेंनी ऐतिहासिक काम केले त्यांची ही भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत हा तालुका आणि जिल्हा अग्रस्थानी राहीला. अनेक वर्षे तुरुंगात जावे लागेल त्याची फिकीर केली नाही. त्यामुळे इथले लोक अडचणी असतील, संकटे असतील तरी स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना खऱ्या अर्थाने पुन्हा शक्ती द्यायची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप केले. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी जे आरोप केले त्याबाबतीत तुमच्या हाती असलेल्या देशाच्या सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचारात सहभागी असेल त्याला पाहीजे ती शिक्षा द्यावी त्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा राहील असेही शरद पवार यांनी जाहीर केले.

नाशिक जिल्हा अनेक क्षेत्रात पुढे जातोय पण येवल्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा लागेल असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले.