ह्यदयनाथ मंगेशकरांची दीदींच्या स्मारकाबाबत प्रतिक्रिया; म्हणाले, दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे…

मुंबई : भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत सध्या राज्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. भाजपा नेते राम कदम यांनी लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्क याठिकाणी व्हावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत देशाने विचार केला पाहिजे, अस म्हटलं. स्मारकाबाबत मागील दिवसांपासून राज्यात आणि देशभरात चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांचे बंधू ह्यदयनाथ मंगेशकर यांनी या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लता मंगेशकर यांंच्या अस्तीचं काल नाशिक येथील गंगेवर विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबीयासोबत खूप लोकं उपस्थित होते. ह्यदयनाथ मंगेशकर यांनी काल एबीपी माझावर लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही. राजकारणातील लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा.

भारतरत्न लता मंगेशकर दीदींच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री उदय सांमत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लता दीदींच्या संगीत स्मारकाची मागणी लगेचच मान्य केली. यापेक्षा जास्त आनंद आम्हाला कुठेचं मिळाला नाही. दीदींचं संगीत स्मारक होतंय यापेक्षा अन्य कुठलंही स्मारक होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.

लता मंगेशकर यांचं ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर लता मंगेशकर ह्या ज्याठिकाणी पंचतत्वात विलीन झाल्यात त्याठिकाणी त्यांचं भव्य स्मारक व्हावं, अशी आमची आणि जनतेची मागणी असल्याचं राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता.