ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्वांना अशाच प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागणार – थोरात

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाला ठाकरे गटातील नेते जाऊन मिळत असल्याने हा संघर्ष आणखी वाढला असून मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे (Sambhaji Thorve) यांना अटक केली आहे. राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोलताना शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांनी ही शिवसेनेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainik) रोष आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)  पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या समाचार घेण्यासाठी शिवसैवनिक सज्ज झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्व लोकांना अशाच प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.

शिवसैनिकांचा हा हल्ला नाही तर त्यांची ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे. ज्यांनी गद्दारी केलीय त्यांच्याविरोधात असा रोष व्यक्त होणारच. प्रत्येक जिल्ह्यातून अशी प्रतिक्रिया येणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी व्यक्त केली आहे.