विनोद कांबळी पुन्हा अडचणीत! दारुच्या नशेत पत्नीला मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद कांबळी याची पत्नी (Vinod Kambli Wife) अँड्रिया हेविटने त्याच्यावर दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल तिच्यावर फेकले, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली; जेव्हा कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे फ्लॅटवर पोहोचला आणि त्याने त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. यानंतर तो किचनमध्ये धावत गेला आणि स्वयंपाकाच्या तव्याचे हँडल घेऊन पत्नीवर फेकले. वांद्रे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस येण्यापूर्वी विनोद कांबळीच्या पत्नीने भाभा रुग्णालयात उपचार घेतले. याप्रकरणी विनोद कांबळीने निवेदन दिले असून, त्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

विनोद कांबळीचे विवादांशी जुने नाते
५१ वर्षीय विनोद कांबळी याचा वादांशी जुना संबंध आहे. काही काळापूर्वी त्याने एका मुलाखतीत नोकरीबद्दल बोलले होते. कांबळीने सांगितले होते की, माझ्याकडे कोणतेही काम नाही आणि तो फक्त बीसीसीआयच्या पेन्शनवर जगत आहे. काही काळापूर्वी तो दारू पिऊन गाडी चालवल्यामुळेही चर्चेत आला होता.