राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं मी म्हणालोच नव्हतो – शरद पवार 

औरंगाबाद- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर सूचक विधान केले. ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं म्हणालोच नव्हतो’, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आपण मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो नव्हतो,’ असं पवारांनी सांगितलं.

पुढे बोलताना भाजपकडून (BJP)लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांना लगावला.

नामांतर करण्याच्या निर्णयाबाबत  नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आलं, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजलं. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणं योग्य नसतं. पण मूलभूत समस्यांकडे अधिक लक्ष दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.