मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता – धंगेकर

Pune – पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. यातच आता कसबा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.