‘कुणालाही घाबरायचं नाही, जुमानायचं नाही, संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena MLAs) ‘वर्षा’ वरून थेट मडमधल्या ‘रिट्रीट’मध्ये पाठवण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, आपल्या सरकारने बघता बघता यशस्वी अडीच वर्ष आपण पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्षही आपलीच आहेत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे. यासाठी कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही, सामान्य शिवसैनिकांला न्याय द्यायचा आहे. संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. संजय पवार हे एक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एका कट्टर शिवसैनिकासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं फुटू नयेत म्हणून शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर सर्व आमदार हॉटेलकडे रवाना झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या बैठकीत काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. वर्षावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विजयाचा आत्मविश्वास दिला आहे.