अजितदादा माझे नेते आहेत, ते सांगतील तिथे मी मतदान करेल – अपक्ष आमदार 

 नांदेड – विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे.

यातच आता मी राज्यसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीसोबत होतो. आता विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी सोबतच असेन. उद्या आघाडीने बोलावलेल्या बैठकीला मुंबईत जाणार आहे. अजितदादा माझे नेते आहेत. ते सांगतील तिथे मी मतदान करेल. मतदान पद्धती गुप्त असल्याने माझे मत कुणाला हे मी कसे सांगेन, असे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत शिवसेना उमेदवार संजय पवार पराभूत झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शामसुंदर शिंदे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. माझे कोणतेही काम असेल तर ते अजिदादांच्या माध्यमातून लगेच होते. सगळे मंत्री मला सहकार्य करतात. मी आघाडीसोबतच आहे. अजितदादा माझे नेते आहेत. उद्या बैठकीत ठरेल त्या उमेदवाराला मी मतदान करेल. पण कुणाला करेन, हे मी जाहीरपणे सांगणार नाही. राऊतांनी संशय घेऊ द्या, पण मी आघाडीसोबत असल्याचे अजितदादांना माहिती आहे, असे शामसुंदर शिंदे म्हणाले.