‘दोन अंकी आकड्याचं पाठबळ सुद्धा कधी मिळाले नाही तरी तुम्ही पंतप्रधान पदाची स्वप्न बघताय’

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काल खा. शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायची मनिषा बोलून दाखवली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी त्यांनी 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोल्हे म्हणाले, जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील शिवरायांचा मावळा पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

‘ज्या दिवशी शरद पवार पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील तो दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदचा असेल. संसद भवनातला शिवरायांचा पुतळा सुद्धा याबद्दल समाधान व्यक्त करेल, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, कोल्हे यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यावरून विरोधक त्यांची खिल्ली उडवत आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी याच मुद्यावरून शरसंधान केले आहे. ते म्हणाले, कोल्हे साहेब, स्वप्न बघायला काय हरकत नाही. राज्याच्या आता पर्यंतच्या प्रवासात दोन अंकी आकड्याचा पाठबळ सुद्धा कधी मिळाला नाही. तरी, तुम्ही पंतप्रधान पदाची स्वप्न बघताय त्या स्वप्ननान माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा. तुमची स्वप्न ही स्वप्नच राहोत..असा टोमणा त्यांनी मारला आहे.