‘मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिल्यास मी राणा दाम्पत्याच्याविरोधात निवडणूक लढवेल’

अमरावती – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

यावर आता महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले आहे. बीडमध्ये माध्यमांशी बोलत असताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवेल, असे थेट आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. तसेच, ”राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत, त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ, असंही ते म्हणाले.