नवनीत राणांचे MIR करताना फोटो, व्हिडिओ व्हायरल; शिवसेनेचा रुग्णालयात राडा

मुंबई – खासदार नवनीत राणा (Mp navneet rana) यांच्याविरोधात शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याची दिसत आहे. कारण, तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग आणि फोटो समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालयात जात राडा घातला.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar), आमदार मनिषा कायंदे(manisha kayande) , राहुल कनाल(Rahul Kanal) यांच्यासह आज शिवसेना नेते आज लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली.

यावेळी रुगणालयात जाऊन प्रशासनाला शिवसेना नेत्यांनी जाब विचारला. यावेळी नवनीत राणा यांचा सीटी स्कॅन करतानाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी हॉस्पिटलने स्पष्टीकरण देण्याची मागणी करत राणांवर झालेल्या उपचारांविषयी शंका उपस्थित करण्यात आली.

स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय, अशी टीका ही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.