सत्यजित तांबे यांचा भाजप करणार गेम ? नाशिक पदवीधर मतदारसंघात येणार ट्वीस्ट

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet Tambe)  यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील (shubhangi patil )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना देखील दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे.

दरम्यान, स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार (suresh pawar) यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे ही लढत दुरंगी नव्हे तर तिरंगी झाली असून भाजपच्या भूमिकेवर सर्वांचेच भवितव्य अवलंबून असणार आहे.

यातच आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी केला आहे.दरम्यान, त्यामुळे भाजप आणि स्वराज्य संघटना एकत्र आल्यास सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.   टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.