पवारसाहेबांनी दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?

मुंबई – पवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले त्याला महेश तपासे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब जातीवादी आहेत असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

गेल्या ५०-५५ वर्षात देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे. हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही याची माहिती महेश तपासे यांनी दिली.

घटना समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आरक्षणा संदर्भामध्ये समान संधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपले ट्विट केले आहे.

जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरीता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारसाहेबांनी म्हटले तर त्यात गैर काय? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.